Bagalkot

बागलकोटमध्ये ऊस उत्पादकांचा एल्गार; ४.३० कोटींच्या थकीत रकमेसाठी आक्रमक पवित्रा

Share

बेळगावनंतर आता बागलकोटमध्येही ऊसदराचा प्रश्न पेटला असून, पालकमंत्री विजयानंद काशप्पनवर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी थकीत देणी देण्याची मागणी केली.

बागलकोट जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस उत्पादक शेतकरी आणि जिल्हा प्रशासन यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला एक हजारांहून अधिक शेतकरी आणि शेतकरी नेते उपस्थित होते. गेल्या हंगामात साखर कारखाने आणि सरकारने दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झाली नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

कारखाने सुरू होण्यापूर्वी दुसऱ्या हप्त्याची प्रतिटन ३०० रुपये थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, तसेच साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) ३१ रुपयांवरून ६१ रुपये करावा, अशी मागणी करण्यात आली.

जिल्ह्यातील एकूण १४ साखर कारखान्यांपैकी बहुतांश कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी दिली आहेत. मात्र, जमखंडी साखर कारखान्याकडे अद्याप ४.३० कोटी रुपये थकीत आहेत. प्रतिटन उसाला अतिरिक्त ५० रुपये देण्याचे मान्य करूनही कारखाना व्यवस्थापनाने ही रक्कम दिलेली नाही.

एफआरपीमधून तोडणी आणि वाहतूक खर्च वजा न करता प्रतिटन उसाला ३,५०० रुपये दर द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यासाठी शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी आणि कारखाना व्यवस्थापनाला निवेदन सादर केले.

Tags: