Belagavi

बेळगाव मनपातही उपलोकायुक्तांचे धाडसत्र; कर्मचाऱ्यांचे फोनपे खाते तपासले

Share

बेळगाव महापालिकेतील कारभार, मूलभूत सोयी-सुविधांची स्थिती आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींची गंभीर दखल घेत उपलोकायुक्त न्यायमूर्ती बी. वीरप्पा यांनी आज महापालिका कार्यालयावर अचानक धाड टाकली.

उपलोकायुक्तांचे धाडसत्र सुरूच असल्याने पालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या कारवाईदरम्यान त्यांनी कर्मचाऱ्यांचे थेट फोनपे (PhonePe) खाते तपासून संशयास्पद व्यवहार आढळल्यास जाब विचारला आणि कामचुकार कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

पाहणीदरम्यान उपलोकायुक्तांनी महापालिकेच्या कचरा वाहतूक वाहनांची उपलब्धता, शहरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, पथदिव्यांची देखभाल आणि स्वच्छतेचा सविस्तर आढावा घेतला. शहरात अलीकडेच बंदी घातलेल्या पतंगाच्या मांजा धाग्यामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेची गंभीर दखल घेत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. केवळ छापे टाकून न थांबता मांजा विक्री करणाऱ्यांवर तातडीने एफआयआर (FIR) दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

याशिवाय पालिकेच्या विविध विभागांना भेटी देऊन त्यांनी सफाई कामगारांचे वेतन, त्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि पदपथांवरील अतिक्रमणांबाबत तीव्र असंतोष व्यक्त केला. सार्वजनिक रस्ते व पदपथ अडवणाऱ्या अतिक्रमणधारकांना तात्काळ नोटिसा बजावून अतिक्रमणे निर्दयीपणे हटवण्याचे आदेश त्यांनी उपायुक्त उदयकुमार तळवार यांना दिले.

त्यानंतर त्यांनी महसूल उपायुक्त सिद्धू हुल्लोळी यांच्याकडून ए-खाता, बी-खाता आणि पीआयडी क्रमांकांची माहिती घेतली. महापालिकेच्या मालकीच्या एकूण मालमत्ता, अतिक्रमण झालेली जागा आणि भाडेतत्त्वावर दिलेल्या गाळ्यांमधून येणारा थकीत महसूल यांचा संपूर्ण हिशोब त्यांनी तपासला.

तपासणीदरम्यान उपलोकायुक्तांनी पालिका कर्मचाऱ्यांचे फोनपे (PhonePe) खाते प्रत्यक्ष तपासून संशयास्पद पद्धतीने जमा झालेल्या मोठ्या रकमांचा तात्काळ हिशोब देण्याचे आदेश दिले. तसेच कार्यालयीन वेळेत काम सोडून भिशी (चीटी) खेळणे आणि इतर बेकायदेशीर प्रकारांत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना तीव्र शब्दांत फटकारले. महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणि शिस्त न बाळगल्यास कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सक्त इशारा त्यांनी दिला.

Tags: