बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री येथील दत्त महाराजांच्या १२१ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त गुरुवारी दुपारी लाखो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजऱ्या झालेल्या उत्सवाची महाप्रसादाने सांगता झाली.

उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दत्त संस्थानच्या व्यवस्थापन मंडळ आणि भक्त मंडळाच्या पुढाकाराने मोठ्या प्रमाणात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. पंत बाळेकुंद्रीसह आसपासच्या गावांतील भाविकांनीही सहभाग घेतला. दत्त महाराजांच्या मंदिरासह गावातील प्रमुख रस्त्यांवर भाविकांची गर्दी दिसून आली.


गावालगतच्या बेळगाव-बागलकोट राज्य महामार्गावर भाविकांच्या वाहनांची संख्या वाढल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. पोलिसांनी बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत करण्याची व्यवस्था केली. यात्रेसाठी आलेल्या भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली.

दरवर्षी होणाऱ्या दत्त महाराजांच्या तीन दिवसीय पुण्यतिथी उत्सवात लाखो भाविक सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतात. यंदाही मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली.


Recent Comments