बेळगावच्या बिम्स रुग्णालयातील वैद्यकीय सेवा आणि प्रशासकीय त्रुटींची दखल घेत राज्याचे उपलोकायुक्त न्यायमूर्ती बी. वीरप्पा यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली.

रुग्णालयातील अस्वच्छता आणि रुग्णांची गर्दी पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, व्यवस्था तातडीने सुधारण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.


उपलोकायुक्त बी. वीरप्पा यांनी रुग्णालयातील विविध वॉर्ड आणि औषध वितरण केंद्रांना भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला आणि त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. ओपीडी काउंटरसमोरील गर्दी पाहून त्यांनी काउंटरची संख्या वाढवण्याचे तसेच भारतीय सैनिकांसाठी स्वतंत्र काउंटर सुरू करण्याचे निर्देश दिले.

तपासणीदरम्यान रुग्णांची योग्य प्रकारे ड्रेसिंग केली जात नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी संबंधित डॉक्टरांना फटकारले. रुग्णालयात मोफत उपलब्ध असलेली औषधे न देता बाहेरील औषध दुकानांतून औषधे घेण्यास सांगितले जात असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णांना आवश्यक औषधे रुग्णालयातच उपलब्ध करून द्यावीत आणि गरीब रुग्णांवर आर्थिक भार पडू देऊ नये, अशी स्पष्ट सूचना त्यांनी बिम्स प्रशासनाला दिली.

शेजारील राज्यांतून उपचारासाठी आलेल्या अन्य भाषिक रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाइकांशी संवाद साधताना उपलोकायुक्त बी. वीरप्पा यांनी या प्रदेशातील पाणी पिताना आणि अन्न खाताना कन्नड भाषाही शिकावी, असे प्रेमाने आवाहन केले. रुग्णालयातील अधिकारी आणि डॉक्टरांनी रुग्णांशी संवेदनशीलतेने वागून त्यांची काळजी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.



Recent Comments