बेळगाव शहरातील शिवबसवनगर येथील श्री कारंजी मठाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आणि कर्नाटक राज्योत्सवाचे औचित्य साधून २ ते ७ नोव्हेंबर दरम्यान शिवानुभव गोष्टी आणि ७ नोव्हेंबर रोजी भव्य सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
कारंजी मठाचे श्री म.नि.प्र. गुरुसिद्ध महास्वामीजी यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या सोहळ्यास निडसोशी येथील श्री दुरादुंडीश्वर सिद्धसंस्थान मठाचे श्रीमन्निरंजन जगद्गुरू डॉ. पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांची दिव्य उपस्थिती लाभणार आहे. बेळगाव नागनूर रुद्राक्षी मठाचे श्री म.नि.प्र. डॉ. अल्लमप्रभू महास्वामीजी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. हुबळी-विजयपूर येथील श्री शांताश्रमाचे श्री षो.ब्र. अभिनव सिद्धारूढ महास्वामीजी यांच्या हस्ते ‘श्री निजगुण शिवयोगी’ या विषयावर सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत शिवानुभव गोष्टीचा प्रारंभ होईल. या प्रसंगी खानापूर येथील श्री मरुळसिद्धेश्वर बृहन्मठाचे श्री ष.ब्र. सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सत्कार केला जाईल. कारंजी मठाचे पूज्य डॉ. शिवयोगी देव यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, केएलई संस्थेचे माजी सचिव डॉ. एफ. व्ही. मानवी यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

या शिवानुभव गोष्टींतर्गत ३ नोव्हेंबर रोजी उप्पिन बेटगेरीच्या तीन हजार शाखा मठाचे श्री म.नि.प्र. कुमार विरूपाक्ष महास्वामीजी ‘श्री मैलार बसवलिंग शरण’ या विषयावर विचार मांडतील. ४ नोव्हेंबर रोजी घोडगेरीच्या श्री शिवानंद मठाचे श्री षो.ब्र. मल्लय्या महास्वामीजी ‘श्री सर्पभूषण शिवयोगी’ या विषयावर शिवानुभव गोष्ठी सादर करतील. ५ नोव्हेंबर रोजी बसवबेळवीच्या श्री चरंतेश्वर मठाचे पूज्य श्री शरणबसवा देव ‘श्री घनमठ शिवयोगी’ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकतील, तर ६ नोव्हेंबर रोजी शेगुणशीच्या श्री विरक्त मठाचे श्री म.नि.प्र. डॉ. महांतप्रभू महास्वामीजी ‘श्री कडकोळ मडिवाळ शिवयोगी’ या विषयावर मार्गदर्शन करतील.
७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता वर्धापन सोहळ्याचा सांगता समारंभ पार पडेल. या कार्यक्रमास गदग-डंबळ येथील जगद्गुरू श्री तोंटदार्य संस्थान मठाचे श्रीमन्निरंजन जगद्गुरू डॉ. तोंटद सिद्धराम महास्वामीजी यांची दिव्य उपस्थिती लाभणार असून, शेगुणशी मठाचे डॉ. महांतप्रभू महास्वामीजी नेतृत्व करतील. तसेच नांदगड येथील श्री विरक्त मठाचे श्री चन्नवीर देव यांची प्रमुख उपस्थिती असेल. या प्रसंगी माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ आणि अशोक आयर्न ग्रुपचे सह-व्यवस्थापकीय संचालक जयंत अशोक हुंबरवाडी यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
दररोज कार्यक्रमाच्या सुरुवातीला कारंजी मठाच्या श्री कुमारेश्वर संगीत पाठशाळेच्या विद्यार्थ्यांकडून वचनावळी व प्रार्थना सादर केली जाईल. शिवबसवनगर येथील कारंजी मठाच्या शिवानुभव मंडपात हे सर्व कार्यक्रम पार पडणार असून, भाविकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री कारंजी मठाच्या वतीने करण्यात आले आहे.


Recent Comments