स्वतःची मुलगी नाही आणि मुलांना बहीण नाही… ही उणीव मनात न ठेवता एका आईने आणि तिच्या मुलांनी परिसरातील शेकडो मुलींनाच आपल्या कुटुंबाचा भाग बनवले. बेळगावच्या सदाशिवनगर येथील काजूकर कुटुंबाचा हा संवेदनशील उपक्रम सध्या संपूर्ण शहरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

सदाशिवनगर येथील रोहिणी शिवराम काजूकर आणि त्यांची मुले साहील व शुभम काजूकर गेल्या १४ वर्षांपासून कोणत्याही प्रायोजकत्वाशिवाय, स्वखर्चाने हा नवरात्रोत्सव आयोजित करत आहेत. घरात मुलगी आणि बहीण नसल्याचे शल्य बाळगण्याऐवजी, त्या परिसरातील शेकडो तरुणींना स्वतःच्या मुली व बहिणी मानून दरवर्षी कन्यापूजन आणि पारंपरिक दांडियाचे आयोजन करतात. या कार्यक्रमात पाश्चात्य पोशाखाऐवजी पारंपरिक पेहरावातून संस्कृती जपली जाते.

या उपक्रमात रोहिणी काजूकर यांच्यासोबत त्यांचा मुलगा साहील काजूकर याचा मोठा सहभाग आहे. काही वर्षांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या अपघातात साहीलने आपला एक हात गमावला. मात्र, या संकटाने खचून न जाता त्याने जिद्दीने आपले आयुष्य सावरले. उत्तम जलतरणपटू असलेल्या साहीलने यापूर्वी तलावात बुडणाऱ्या तरुणांचे प्राणही वाचवले आहेत. एक हात नसतानाही तो दुचाकी आणि चारचाकी वाहने सहज चालवतो, तसेच या उत्सवाची संपूर्ण धुरा सांभाळतो.
विशेष म्हणजे या सोहळ्यात सर्वभाषिक नागरिक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. सदाशिवनगर आणि नेहरूनगर परिसरातील तरुणी १५ दिवस आधीपासूनच या सोहळ्याच्या तयारीला लागतात.
स्थानिक नागरिक आणि महिलांचा या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा असून, काजूकर कुटुंबाची ही निस्वार्थ भावना समाजासाठी आदर्श ठरत आहे.


Recent Comments