बेळगाव तालुक्यातील मण्णूर येथील शासकीय गायरान जमिनी विविध प्रकल्पांसाठी अधिग्रहण करण्याच्या निर्णयाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. मण्णूर गावातील देवस्की पंच कमिटी व प्रमुख व्यक्तींच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
मण्णूर गावातील पंच्याहत्तर टक्क्यांहून अधिक लोक कृषी आणि पशुपालनावर अवलंबून आहेत. गावात आधीच जमिनीचा अभाव असताना सर्व्हे नं. १०१ मधील क्रीडा मैदान आश्रय योजनेसाठी वापरण्यास आणि सर्व्हे नं. १४७ मध्ये कचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी चाललेले सर्वेक्षण तात्काळ थांबवावे, असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

सर्व्हे नं. ५ च्या जागेवर दरवर्षी धार्मिक रेणुका यात्रा आणि दसरा सीमाङ्गमनाचा कार्यक्रम होत असल्यामुळे ती जागा तशीच ठेवावी, अशी विनंती करण्यात आली आहे. जनावरांसाठी चारा आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हे गायरान अतिशय महत्त्वाचे असून, भूसंपादन न थांबवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आर.एम. चौगुले यांनी दिला आहे.
यावेळी विनय कदम, अरुण, मारुती चौगुले, यल्लाप्पा करटकर, संदीप डोणकरी आणि रवी चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments