Vijayapura

विजापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यावरून राजकीय कलगीतुरा

Share

विजापूर जिल्ह्यात तीव्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून सरकारने काही तालुके वगळल्याने राजकीय वाद पेटला आहे. यावरून भाजप नेत्यांनी पालकमंत्री एम. बी. पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. या राजकीय संघर्षावर एक विशेष अहवाल…

राज्य सरकारने विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ, सिंदगी, अलमेल, देवरहिप्परगी, बसवण बागेवाडी, बबलेश्वर आणि तिकोटी या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र ताळीकोटी, चडचण आणि इंडी हे तालुके या यादीतून वगळल्याने भाजप आक्रमक झाली आहे. यावर उत्तर देताना मंत्री एम. बी. पाटील यांनी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच दुष्काळ जाहीर केला जात असल्याचे स्पष्ट केले.

पालकमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणानंतर भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ए. एस. पाटील नडहल्ली यांनी सरकारवर जोरदार टीका केली. उर्वरित तीन तालुके पुढील तीन दिवसांत दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी २१ सप्टेंबरला ताळीकोटी बंद, २२ सप्टेंबरला विजापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन आणि २३ सप्टेंबरपासून तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.

भाजपच्या आक्रमक पवित्र्यानंतर मंत्री एम. बी. पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे पुन्हा स्पष्टीकरण दिले आहे. उर्वरित चार तालुक्यांमध्ये सोमवारपर्यंत ग्राउंड ट्रुथिंगचे काम पूर्ण केले जाईल आणि निकषांनुसार त्या तालुक्यांमध्येही दुष्काळ जाहीर केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

एकंदरीत, विजापूर जिल्ह्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, सरकारच्या पुढील निर्णयाकडे आता शेतकरी आणि राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
विजयकुमार सारवाड
इन न्यूज, विजापूर.

Tags: