Vijayapura

कृष्णा काठ गोळीबाराने हादरला; पेट्रोल पंप मालकाचा दोघांवर गोळीबार

Share

भिमा काठानंतर आता विजापूर जिल्ह्यातील कृष्णा काठही गोळीबाराच्या घटनेने हादरला आहे. कोलहार तालुक्यातील मट्टीहाळ गावात एका पेट्रोल पंप मालकाने परवाना असलेल्या पुस्तुलमधून केलेल्या गोळीबारात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

मट्टीहाळ येथील पेट्रोल पंप मालक संगप्पा पुजारी याने किरकोळ वादातून सुखदेव चलवादी आणि राजू चलवादी यांच्यावर गोळीबार केला. दोघेही जखमी बी.एल.डी.ई. रुग्णालयात उपचार घेत आहेत. काल गावात पार पडलेल्या जत्रेदरम्यान झालेल्या वादाची पार्श्वभूमी या घटनेला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

आज दुपारी सुखदेव आणि राजू पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेले असता मालक संगप्पा याच्याशी पुन्हा वाद झाला. या वादाचे रुपांतर हिंसेत होऊन संगप्पाने थेट पिस्तूल काढून दोघांवर गोळीबार केला. जखमी दोघेही बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करतात.

घटनेची माहिती मिळताच कोलहार पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्परतेने कारवाई करत आरोपी संगप्पा पुजारीला ताब्यात घेतले आहे. गोळीबारामागचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
विजयकुमार सारवाड
इन न्यूज, विजापूर.

Tags: