विजापूर जिल्ह्यात मंत्री एम. बी. पाटील आणि आमदार बसणगौडा पाटील यत्नाळ यांच्यातील वाकयुद्धाला आता नवीन वळण मिळाले आहे. बबलेश्वर मतदारसंघातील राजकारणावरून यत्नाळ यांनी केलेल्या आरोपांना आता विजुगौडा पाटील यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे.


विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर मतदारसंघात मंत्री एम. बी. पाटील यांच्याविरोधात विजुगौडा पाटील तीनदा पराभूत झाले आहेत. याच मुद्यावरून आमदार यत्नाळ यांनी विजुगौडा यांच्यावर निशाणा साधला होता. एम. बी. पाटील यांना जिंकवण्यासाठी विजुगौडा यांना कमकुवत उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले जाते आणि दोघांमध्ये अंतर्गत गुप्त युती आहे, असा आरोप यत्नाळ यांनी केला होता.

या आरोपांवर प्रत्युत्तर देताना विजुगौडा पाटील यांनी यत्नाळ हे एम. बी. पाटील यांचे पाळीव पोपट असल्याचे म्हटले. एम. बी. पाटील यांच्याशी कोणतीही तडजोड सिद्ध झाल्यास राजकारणातून निवृत्ती घेईन, असे आव्हान त्यांनी दिले. गेल्या निवडणुकीत बबलेश्वरमध्ये आपणाला ८० हजारांपेक्षा जास्त मते मिळाली होती, असे त्यांनी सांगितले. तसेच यत्नाळ यांनी एम. बी. पाटील यांच्या बाजूने अप्रत्यक्ष प्रचार केल्याचा आरोप त्यांनी केला. ताकद असेल तर पुढील निवडणुकीत यत्नाळ यांनी बबलेश्वर मतदारसंघातून एम. बी. पाटील यांच्याविरोधात लढावे, असे प्रतिआव्हान त्यांनी दिले. तसेच १८ सप्टेंबर रोजी अरकेरी अमोघसिद्धेश्वर मंदिरात येऊन देवापुढे शपथ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
एम. बी. पाटील आणि यत्नाळ यांच्यातील राजकीय संघर्षात आता विजुगौडा यांची एन्ट्री झाली आहे. या वाकयुद्धाला पुढे काय वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Recent Comments