Vijayapura

पालकमंत्री एम. बी. पाटील यांच्या आश्वासनानंतर शेतकरी आंदोलन स्थगित

Share

विजापूर जिल्ह्यात पावसाच्या अभावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, या मागणीसाठी गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन पालकमंत्री एम. बी. पाटील यांच्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

कर्नाटक राज्य शेतकरी संघ आणि हसिरू सेनेच्या वतीने आंबेडकर चौकात आंदोलन सुरू होते. पालकमंत्र्यांचे खाजगी सचिव महांतेश बिरादार यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून शेतकरी नेत्यांशी संवाद साधला. जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची माहिती मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांपर्यंत पोहोचवली असून, जिल्ह्यातील सर्व १३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याची माहिती शेतकरी संघाचे जिल्हाध्यक्ष संगमेश सगर यांनी दिली. येत्या १० दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास २५ हजार शेतकऱ्यांसह सोलापूर-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

प्रतिएकरी ५० हजार रुपये भरपाई, विम्याची ५० टक्के रक्कम तात्काळ देणे, तलाव आणि कालवे भरणे, जनावरांसाठी चाऱ्याची सोय करणे आणि मजुरांना २०० दिवसांचे काम देणे अशा विविध मागण्या शेतकरी संघटनेने केल्या आहेत. असे संगमेश सगर यांनी म्हटले.

यावेळी शेतकरी संघाचे जिल्हा सरचिटणीस रामनगौडा पाटील, उपाध्यक्ष महादेव बनसोडे, संगप्पा टक्के, नगरविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष गंगाधर संबन्नी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Tags: