विजापूर येथील आंतरराष्ट्रीय वेलोड्रोमवर १२ आणि १३ सप्टेंबर रोजी १३वी राज्यस्तरीय ट्रॅक सायकलींग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कर्नाटक हौशी सायकलींग असोसिएशनचे अध्यक्ष राजू बिरादार यांनी दिली.

विजापूर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलींग वेलोड्रोमवर पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या चॅम्पियनशिपमध्ये विजापूर, बेळगाव, बागुलकोट, बेंगळुरू, म्हैसूर, बिदरसह विविध जिल्ह्यांतील २०० खेळाडू आणि ५० हून अधिक तांत्रिक अधिकारी सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी चार प्रकारच्या स्पर्धा खेळवल्या जाणार असून, विजेत्यांची नोव्हेंबरमध्ये राँची येथे होणाऱ्या राष्ट्रीय सायकलींग स्पर्धेसाठी निवड केली जाईल. तसेच २६ व २७ सप्टेंबर रोजी महिलांसाठी ‘अस्मिता सायकलींग खेलो इंडिया’ स्पर्धा पार पडणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ करणार असून आमदार सुनीलगौडा पाटील, महापौर एम. एस. करडी, जिल्हाधिकारी डॉ. आनंद के., पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी आदी उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला असोसिएशनचे उपाध्यक्ष राजासाब अत्तार, सचिव संजीव पडतारे, प्रदीप राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments