अहिंद (अल्पसंख्याक, मागासवर्गीय व दलित) नेत्यांमधील मतभेद आणि फूट वाढल्यास त्याचा थेट फटका काँग्रेस पक्षाला बसून मोठे नुकसान होऊ शकते, असा इशारा लोकोपयोगी आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिला. अहिंदचे नेतृत्व कोणीही करू शकते, आम्हीच केले पाहिजे असे काही नाही; जनता ज्यांना स्वीकारेल तेच अहिंदचे खरे नेते ठरतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.

सोमवारी बंगळुरू येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, डॉ. जी. परमेश्वर आणि आपल्यातील संबंधांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, सध्या कोणतीही गंभीर समस्या निर्माण झालेली नाही आणि सर्व वरिष्ठ नेते आपापसात चर्चा करत आहेत.

सिद्धरामय्या आणि आपल्यामध्ये कोणी कटकारस्थान रचत आहे का, यावर बोलताना ते म्हणाले की, संताप किंवा राग व्यक्त करण्याची गरज नाही. पक्षाने आणि सरकारने दिलेली जबाबदारी पार पाडणे आणि समाजसेवा करणे हेच आपले मुख्य ध्येय आहे. काही लोकांचा उद्देश या चळवळीत फूट पाडण्याचा आहे, हे नेत्यांनी ओळखून त्यानुसार पुढे पावले उचलली पाहिजेत. तसेच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासोबतचे संबंध आणि अहिंद चळवळ यांचा काहीही थेट संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात जातनिहाय जनगणना लवकरात लवकर लागू झाली पाहिजे, ही आपलीही ठाम मागणी आहे. अहवाल पूर्ण प्राप्त झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.


Recent Comments