Belagavi

असहाय्य पंजाबी व्यक्तीला ‘हेल्पिंग हँड्स’ आणि पोलिसांचे सहकार्य

Share

बेळगावजवळ असहाय्य अवस्थेत फिरणाऱ्या पंजाबमधील एका व्यक्तीला काकती पोलिस आणि डिव्हाइन हेल्पिंग हँड्सच्या पथकाने मदत करून सुरक्षितपणे त्याच्या घरी पाठवले.

मानसिक स्थिती बिघडलेल्या या व्यक्तीला गेल्या आठ दिवसांपासून अन्नाविना वंटमुरी परिसरात भटकावे लागत होते. पंजाबमधील अमृतसर येथील ही व्यक्ती बेळगावपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर वंटमुरी महामार्गाजवळ ट्रकचालकाने सोडून दिल्याचे सांगण्यात आले. मातृभाषा पंजाबी असल्याने स्थानिकांना त्यांच्याशी संवाद साधण्यात अडचण येत होती.

याबाबत माहिती मिळताच काकती पोलिसांनी डिव्हाइन हेल्पिंग हँड्सचे समाजसेवक गजानन गवाणे यांच्याशी संपर्क साधला. गवाणे आणि त्यांच्या पथकाने वंटमुरी येथे जाऊन व्यक्तीची विचारपूस केली. त्यांच्या खिशातील आधारकार्डच्या आधारे कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात यश आले.

त्यानंतर स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. बेळगाव ते दिल्ली रेल्वेचे तिकीट काढून देत प्रवासादरम्यान जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या गावी पाठविण्यात आले.

या मदतकार्यात काकती पोलिस ठाण्याचे कर्मचारी, रेल्वे पोलिस तसेच राजू राऊत, आशिष गवाणे, अवधूत तुडवेकर आणि पद्मप्रसाद हुले यांनी सहकार्य केले.

Tags: