Kagawad

दिवंगत चेन्नम्मा देवेगौडा यांना जेडीएसकडून श्रद्धांजली

Share

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या पत्नी आणि केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या मातोश्री चेन्नम्मा यांच्या निधनाबद्दल कागवाड येथील जेडीएस कार्यालयात शोकसभा घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

जेडीएसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार कल्लाप्पाण्णा मग्गेनवर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. माजी पंतप्रधान देवेगौडा किंवा केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांना भेटायला गेल्यावर चेन्नम्मा आई अत्यंत प्रेमाने चौकशी करायच्या आणि जेवू घातल्याशिवाय पाठवत नसत, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

जेडीएसचे राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार शहाजहान डोंगरेगाव म्हणाले की, देवेगौडा यांच्या राजकीय यशामागे आणि मोठ्या कर्तृत्वामागे चेन्नम्मा यांची मोठी प्रेरणा होती. त्या साक्षात अन्नपूर्णेश्वरी होत्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. हुक्केरी तालुका जेडीएस अध्यक्ष बसवराज पाटील यांनीही पक्षाच्या उभारणीत त्यांचे आशीर्वाद महत्त्वाचे होते, असे सांगत आदरांजली वाहिली.

या शोकसभेला जेडीएसचे जिल्हा संघटक सचिव मल्लिकार्जुन कणशेट्टी, चिकोडी जिल्हा जेडीएस नेते एस. एस. दवळेश्वर, शब्बीरगौडा पाटील, जक्कप्पा दरीगौडर, दुंडप्पा निंगनूर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: