Bagalkot

बागलकोट जिल्ह्यात विवाहितेची निर्घृण हत्या

Share

बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका विवाहित महिलेचा मृतदेह ऊसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. अनैतिक संबंधातून प्रियकरानेच ही हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यामधील वर्चगल गावाजवळ असलेल्या ऊसाच्या शेतात ३० वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह सापडला. अनुसूया लक्ष्मण रंगाण्णावर असे मृत महिलेचे नाव असून, ती बदनूर गावची रहिवासी होती. ७ जुलै रोजी बाजार करण्यासाठी लोकापूर शहरात गेलेली अनुसूया परत घरी आली नव्हती. त्यामुळे तिच्या पतीने ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र, चार दिवसांनंतर तिचा मृतदेह शेतात आढळून आला असून, तिची हत्या करून मृतदेह फेकून दिल्याचे समोर आले आहे.

हलगली गावचा रहिवासी सोमप्पा हळ्ळी याच्यासोबत मृत महिलेचे अनैतिक संबंध होते आणि त्यानेच हे कृत्य केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी लोकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags: