बेळगाव शहरात झालेल्या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी तांत्रिक समस्या निर्माण झाल्या असून, वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरून नाराजी व्यक्त केली आहे.

बेळगावमधील अंजनेय नगर सेक्टर १० मध्ये गेल्या ३६ तासांपासून सलग वीज पुरवठा खंडित झाला आहे. पावसामुळे वीज यंत्रणा कोलमडल्याने संपूर्ण परिसर अंधारात असून स्थानिक रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही विस्कळीत झाला असून, या परिस्थितीला हेस्कॉम (HESCOM) अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी रस्त्यावर उतरून हेस्कॉमविरोधात आंदोलन सुरू केले. नागरिकांच्या आंदोलनाची माहिती मिळताच हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
ही घटना माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत नागरिकांची समजूत काढली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. वीज वितरण कंपनीने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


Recent Comments