Belagavi

सुवर्णसौधमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीती महसूल दिन साजरा

Share

महसूल विभागातील जुन्या चुका आणि कामकाजातील त्रुटी दुरुस्त करणे हेच सध्या आपल्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी केले आहे.

बेळगाव येथील सुवर्णसौध येथे महसूल विभागाच्या वतीने महसूल दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर, शासनाचे अप्पर सचिव राजेंद्रकुमार कटारिया, प्रादेशिक आयुक्त जानकी के. एम. आणि बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासह विभागातील विविध जिल्हाधिकाऱ्यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

कार्यक्रमात मुख्य भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी सांगितले की, महसूल विभागाला जुन्या चुका सुधारण्याची अत्यंत मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. ही गुंतागुंतीची समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी अनिवार्यपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. राज्यातील अनेक वस्त्या अजूनही महसूल गावे म्हणून घोषित न झाल्यामुळे तेथील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. अशा वस्त्यांना महसूल गावांचा दर्जा देण्यास होणारा विलंब हा प्रशासकीय व्यवस्थेतील दोष असल्याचे त्यांनी नमूद केले.

महसूल व्यवस्थेच्या इतिहासाबाबत बोलताना त्यांनी प्राचीन काळापासून ते महाभारतातील संदर्भांचा उल्लेख केला. ब्रिटिशांच्या काळात कठोर अंमलबजावणी करून पन्नास टक्के महसूल गोळा केला जात होता आणि त्याविरुद्ध जनता एकत्र येत असे, याची त्यांनी आठवण करून दिली. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्येक जमिनीचा नकाशा तयार करण्याच्या विभागाच्या नवीन पावलाचे त्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला असून महसूल विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

Tags: