केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी कोल्हापूरकडे निघालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी हत्तरगी टोल नाक्यावर रोखले. या कारवाईच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले, तर दुसऱ्या शिष्टमंडळाने कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.


अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी समितीचे कार्यकर्ते निघाले होते. मात्र, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेचे कारण देत बेळगाव पोलिसांनी हत्तरगी टोल नाक्यावर त्यांना रोखले. या कारवाईला समितीचे नेते अमर येळ्ळूरकर यांनी आक्षेप घेत लेखी आदेशाची मागणी केली. पोलिसांनी आदेश दाखवण्यास नकार दिल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले.

गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नावर अमित शाह यांची भेट घेऊन मराठी भाषिकांची बाजू मांडण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता. यासाठी कोल्हापूर प्रशासनाकडे वेळ मागण्यात आली होती. तसेच ‘पुढारी’ वृत्तपत्राचे संपादक प्रतापसिंह जाधव यांनीही ही भेट घडवून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते, अशी माहिती समितीच्या नेत्यांनी दिली.
दुसरीकडे, कोल्हापुरात पोहोचलेल्या समितीच्या दुसऱ्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. राज्य पुनर्रचना आयोगाकडून झालेला अन्याय दूर करावा आणि सर्वोच्च न्यायालयातील खटल्याला गती द्यावी, अशी मागणी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी केली. यावर, अमित शाह यांच्याशी चर्चा करून योग्य ती बैठक घडवून आणण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या प्रसंगी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments