बेळगाव येथील लक्ष्मी नगर बुडा प्लॉट परिसरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठ्यामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये गटाराचे पाणी मिसळत असल्याच्या निषेधार्थ स्थानिक रहिवाशांनी आज महानगरपालिका कार्यालयात जाऊन आयुक्तांना निवेदन दिले.

बेळगावातील लक्ष्मी नगर परिसरातील मरगाई गल्लीत ही समस्या गंभीर बनली आहे. मलप्रभा टप्पा १ च्या या भागात अनेक कुटुंबे राहतात, मात्र येथील मुख्य रस्ता आणि मलनिस्सारण वाहिनीची गेल्या २५ वर्षांपासून दुरुस्ती झालेली नाही. गटाराचे चेंबर्स वारंवार ओसंडून वाहत असल्याने हे दूषित पाणी थेट पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीमध्ये मिसळत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

पावसाळ्यात तर गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत थेट लोकांच्या घरात शिरत असल्यामुळे परिसरात साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या समस्येबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींसह पालिका आयुक्त आणि संबंधित अभियंत्यांकडे दोन ते तीन वेळा लेखी तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर रहिवाशांनी आज पालिका आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन शुद्ध पिण्याचे पाणी आणि रस्ते व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.


Recent Comments