बेळगावात वीज वितरणाचे खासगीकरण करण्याच्या सरकारच्या धोरणाविरोधात केपीटीसीएल कर्मचारी आणि अधिकारी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.


सध्या हेस्कॉम कडेच वीज वितरणाचा परवाना आहे. मात्र, टाटा पॉवर कंपनीने बेळगाव, धारवाड आणि उत्तर कन्नड जिल्ह्यांमध्ये वीज वितरणासाठी बंगळुरूच्या केइआरसीकडे अर्ज केला आहे. ही खासगी कंपनी केवळ नफा मिळवून देणाऱ्या व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रांनाच लक्ष्य करत असल्याचा आरोप होत आहे. हेस्कॉम स्वतः पुरवत असलेल्या वीज पुरवठ्यापैकी ५५ टक्के वीज शेतकऱ्यांना देते आणि अवघी १५ टक्के वीज उद्योगांना पुरवते. उद्योगांकडून मिळणाऱ्या नफ्यातून शेतकऱ्यांच्या अनुदानाचा तोटा भरून काढत हेस्कॉम सामाजिक बांधिलकी जपत आहे. टाटा पॉवरला परवानगी मिळाल्यास ग्राहकांना हेस्कॉमपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील, अशी भीती केईबी संघटनेचे सचिव दीपक डी. यांनी व्यक्त केली.

खासगीकरणामुळे केवळ कर्मचाऱ्यांचेच नव्हे, तर सर्वसामान्य ग्राहकांचेही मोठे नुकसान होणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या विरोधात ग्राहकांची स्वाक्षरी मोहीम राबवून बंगळुरूला निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना काळ आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळातही कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक सेवा दिली असून खासगी कंपन्या अशी सेवा देऊ शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया आंदोलन करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी दिली.
टाटा पॉवर कंपनीने २००३ च्या कायद्यानुसार समांतर जोडणीसाठी अर्ज केला आहे. खासगी कंपनीला परवानगी मिळाल्यास ग्राहकांना मिळणारी गृहज्योती, भाग्यज्योति यांसारखी सरकारी अनुदाने बंद होतील आणि दुप्पट बिल भरावे लागेल. त्यामुळे ग्राहकांनी या लढ्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन कामगार संघटनेचे संघटन सचिव मारुती दोड्डमणी यांनी केले. या आंदोलनात अधीक्षक अभियंता प्रविण कुमार चिकडे, शिवाजीराव कर्रे, विनोद केरूर, संजय गोन्साल्विस यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments