gokak

गोकाक : शीतपेयातून कीटकनाशक देऊन पत्नीचा खून

Share

गोकाक तालुक्यात अनैतिक संबंधाच्या कारणावरून पतीनेच पत्नीची विष देऊन आणि गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पत्नीच्या अपघाताचा बनाव रचणाऱ्या संशयित पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

बेळगावमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत एसपी के. रामराजन यांनी घटनेची माहिती दिली. संतोष रेवप्पा पटायीत (३३, रा. घटप्रभा शिंदिकुरबेट) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून सावक्कां (३२) असे मृत पत्नीचे नाव आहे.

१२ जून रोजी हे दाम्पत्य मरकुंबी मंदिरातून परत येत असताना, संतोषने मुरगोडजवळ जीरा सोडा खरेदी केला. त्याने पत्नीला नकळत तिच्या सोड्याच्या बाटलीत कीटकनाशक आणि विषारी रसायन मिसळले. शितलीबावीजवळ पोहोचताच विषामुळे सावक्कां हिची प्रकृती खालावली, त्यानंतर संतोषने बाईक थांबवून तिचा गळा आवळून खून केला.

यानंतर संशयिताने स्वतः गोकाक ग्रामीण पोलिसांना फोन करून बाईक घसरून अपघात झाल्याची माहिती दिली होती. मात्र, रुग्णालयात आणले असता पत्नीचा मृत्यू झाला होता. अपघात होऊनही पतीला कोणतीही दुखापत झाली नव्हती. यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी चौकशी करत संशयिताला अटक केली. गोकाक ग्रामीण पोलिस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे.

Tags: