Belagavi

बेळगाव मोठा जिल्हा, मंत्रिमंडळात किमान दोन पदे मिळावीत; बंगळूरमध्ये मंत्री सतीश जारकीहोळींची मागणी

Share

बेळगाव जिल्ह्याला मंत्रिमंडळात किमान दोन मंत्रीपदे मिळालीच पाहिजेत, अशी ठाम मागणी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी हायकमंडकडे केली आहे.

बंगळूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी बेळगाव हा मोठा जिल्हा असल्याने अधिक प्रतिनिधित्वाची गरज असल्याचे सांगितले, तसेच राज्य सरकार कोसळणार या भाजपच्या दाव्याची जोरदार खिल्ली उडवली.

पत्रकार परिषदेत मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, “बेळगाव जिल्ह्यात ११ आमदार असून हा एक मोठा जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळायलाच हवीत. गेल्या वेळी दोन पदे होती, या वेळी त्यात एकाची वाढ करून तीन दिली तरी चुकीचे नाही.” आमदार लक्ष्मण सवदी यांच्या मंत्रीपदाच्या चर्चेवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आम्ही वैयक्तिक कोणाचे नाव सुचवलेले नाही, हायकमंड यावर अंतिम निर्णय घेईल. तसेच महिलांना मंत्रीपद देण्यासही त्यांनी पाठिंबा दर्शवला.

पुढील तीन महिन्यांत काँग्रेस सरकार पडेल, या भाजपच्या वक्तव्याचा समाचार घेताना ते म्हणाले की, विरोधक पहिल्या दिवसापासून हेच बोलत आहेत. सिद्धरामय्या यांचे ‘पार्ट-१’ सरकार पूर्ण झाले असून, आता हे ‘पार्ट-२’ सरकार सुरू आहे, त्यामुळे सरकार पडण्याचा प्रश्नच येत नाही. कर्नाटकची राजकीय परिस्थिती महाराष्ट्र किंवा पश्चिम बंगालसारखी नाही, आमचे सरकार पूर्णपणे सुभद्र आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tags: