Belagavi

बेळगावात रहदारी पोलिसांकडून ‘हेल्मेट जनजागृती सप्ताह’

Share

बेळगाव शहरातील वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या वतीने आजपासून विशेष ‘हेल्मेट जनजागृती सप्ताह’ सुरू करण्यात आला आहे. दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरण्याचे कडक आवाहन या मोहिमेद्वारे करण्यात आले आहे.

राणी चन्नम्मा चौकात उत्तर विभागाचे आयजीपी संदीप पाटील यांच्या हस्ते या सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे उपस्थित होते. यावेळी वाहनधारकांना माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले.

यावेळी आयजीपी संदीप पाटील यांनी सांगितले की, उत्तर विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन वर्षांत दरवर्षी सरासरी २,००0 प्राणांतिक अपघात झाले आहेत. केवळ दंडात्मक कारवाई करून अपघात थांबणार नाहीत, तर नागरिकांनी स्वतःहून सुरक्षेचे नियम पाळणे गरजेचे आहे.

शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हा आठवडाभराचा उपक्रम राबवला जात आहे. यादरम्यान शाळा-कॉलेजांमध्ये जनजागृती केली जाईल. तसेच विना हेल्मेट दुचाकीधारकांना पेट्रोल न देण्याबाबत पेट्रोल पंप चालकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक रामराजन के. यांनी माहिती दिली की, जिल्ह्यात वर्षाला सरासरी ८०० ते ८५० लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो, तर ३,००० लोक जखमी होतात. वाहतूक पोलीस सुरक्षेसाठीच दंडात्मक कारवाई करतात. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः हेल्मेट घालून वाहन चालवत जनजागृती केली.

Tags: