बेळगाव महापालिकेत कर्नाटकाच्या बाजूने सीमा ठराव संमत करण्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या वादात आता बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी उडी घेतली आहे. “बेळगाव हा कर्नाटकाचा अविभाज्य भाग असताना महापालिकेत स्वतंत्र ठराव मांडण्याची गरज काय?” असा थेट सवाल त्यांनी भाजपच्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

शहरात सर्व भाषिक नागरिक गुण्यागोविंदाने राहत असून अनावश्यक वादापेक्षा विकासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठी भाषिक पाकिस्तानमध्ये राहात नाहीत त्यामुळे अनावश्यक वादापेक्षा शहराच्या विकासावर लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कन्नड संघटनांच्या मागणीनंतर प्रादेशिक आयुक्तांनी महापालिका आयुक्तांकडे अहवाल मागविल्याने हा वाद पेटला आहे. यावर बोलताना शेट्टर म्हणाले की, बेळगावमध्ये दरवर्षी कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन भरते, यावरूनच बेळगाव कर्नाटकाचा भाग असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे स्वतंत्र ठरावाचा प्रश्नच येत नाही. तसेच, ठराव मंजूर झाला नाही म्हणून सरकार महापालिका बरखास्त करेल ही भीतीही त्यांनी फेटाळली. केवळ ठराव मंजूर करून प्रश्न सुटत नाहीत, असे सांगत त्यांनी कळसा-भांडुरा प्रकल्पाचे उदाहरण दिले आणि लोकप्रतिनिधींनी बेळगावच्या मुख्य विकासकामांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.


Recent Comments