बंगळुरूमधील चिन्नास्वामी क्रीडांगणाच्या आसनक्षमतेच्या कमतरतेबद्दल केएससीएचे अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला असून स्टेडियम अद्ययावत करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान बेळगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उत्तर कर्नाटकातील क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी दिली आहे.


बेळगावमधील बी.के. मॉडेल कॉलेजमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यंकटेश प्रसाद म्हणाले की, बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएल सामने पाहण्यासाठी दिवसेंदिवस मागणी वाढत असून सध्या क्रीडांगणावर आसनक्षमतेची टंचाई निर्माण झाली आहे. स्टेडियमची क्षमता ३२ हजार प्रेक्षकांची असली तरी केवळ २७ हजार लोकांनाच सामना पाहण्याची संधी मिळत असून मैदानावर ३६० अंश कोनातून सामना पाहणे शक्य होत नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर स्टेडियम अद्ययावत करण्याची तयारी सुरू असून याला सरकारचा पूर्ण पाठिंबा मिळाला आहे. आगामी ऑक्टोबरमध्ये एकदिवसीय आणि डिसेंबरमध्ये टी-२० सामने बंगळुरूमध्ये खेळवले जातील, असे व्यंकटेश प्रसाद यांनी स्पष्ट केले.

हुबळीमध्ये महाराजा ट्रॉफी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला असून यामध्ये क्रिकेट क्षेत्रातील दिग्गज राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ सहभागी झाले होते अशी माहिती त्यांनी दिली. याच वेळी हुबळीचे सुपुत्र अविनाश वैद्य यांची बीसीसीआयचे मॅनेजर म्हणून निवड होणे ही संपूर्ण विभागासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगत आगामी काळात महाराजा ट्रॉफीमध्ये आणखी नवीन संघांचा समावेश करण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बेळगावच्या केएससीए मैदानावर सामन्यांचे आयोजन का केले जात नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अध्यक्ष काहीसे संतप्त झाले. हा प्रश्न तुम्ही यापूर्वीच्या व्यवस्थापन समितीला विचारायला हवा होता, आम्ही बीसीसीआयच्या सामन्यांचे आयोजन करताना कोणताही भेदभाव केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हुबळीमध्ये रणजी करंडकाचा अंतिम सामना खेळवला असून कलबुर्गी आणि रायचूर भागालाही समान प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगावचे मैदान आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी वापरणे शक्य नसले तरी बीसीसीआयचे देशांतर्गत सामने आणि सराव सामन्यांचे आयोजन करण्यासाठी बेळगाव हे अत्यंत उत्तम ठिकाण आहे. त्यामुळे आगामी काळात बेळगावमध्ये नक्कीच सामने खेळवले जातील, अशी ग्वाही व्यंकटेश प्रसाद यांनी दिली.
या प्रसंगी अविनाश पोतदार, वादिराज पाटील आणि विलास जोशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments