बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथील रवींद्र दानव्वागोळ आत्महत्या प्रकरणाचे पडसाद आता राज्यभरात उमटत आहेत. डेथनोटमध्ये प्रभावशाली व्यक्तींची नावे असूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करत दलित संघटनांनी आज भव्य आंदोलन केले.


बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील बेटगेरी येथील रवींद्र दानव्वागोळ यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे जिल्ह्यात तीव्र असंतोष पसरला आहे. मृत रवींद्र यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या डेथनोटमध्ये डीवायएसपी मुल्ला आणि पीएसआय आनंद यांच्यासह अनेक प्रभावशाली व्यक्तींच्या नावांचा उल्लेख केला होता. मात्र, घटना घडून दहा दिवस उलटले तरी आरोपींवर कोणतीही कठोर कायदेशीर कारवाई न झाल्याने, आज दलित संघटनांच्या महासंघाच्या वतीने बेळगावमधील नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयासमोर भव्य निदर्शने करण्यात आली.

मृत रवींद्र यांची आई बसव्वा आणि पत्नी आरती यांनी अश्रू ढाळत न्यायाची मागणी केली. दोषी व्यक्ती कितीही प्रभावशाली असल्या तरी त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि आमच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाला पोलीस खातेच जबाबदार आहे, अशी प्रतिक्रिया बसव्वा आणि आरती यांनी दिली.
डेथनोटमध्ये नाव असलेल्या प्रत्येकाची चौकशी करून त्यांना तुरुंगात पाठवावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली. दलित संघटनांच्या नेत्यांनी पोलीस प्रशासनाच्या दिरंगाईचा तीव्र निषेध केला असून डीवायएसपी मुल्ला, पीएसआय आनंद, लक्ष्मण चंदरगी आणि शिवानंद यांच्यासह डेथनोटमध्ये नाव असलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. आगामी काळात अटक न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दलित संघटनांच्या नेत्यांनी दिला.


Recent Comments