केंद्र सरकारच्या केंद्रीय सायकलिंग असोसिएशनच्या वतीने १३ जून रोजी बेळगावमधील हनुमान नगर येथे भव्य सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बेळगाव सायकलिंग जिल्हाध्यक्ष अनिल पोतदार यांनी दिली.

शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अनिल पोतदार म्हणाले की, गेल्या वेळी आयोजित ‘अस्मिता खेलो इंडिया’ महिला सायकलिंग स्पर्धेच्या यशानंतर, यंदा अधिक व्यापक स्तरावर या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी योजनेचा भाग म्हणून तरुण पिढीमध्ये आरोग्यदायी जीवनशैली रुजवणे आणि पर्यावरणपूरक वाहतुकीबद्दल जागरूकता निर्माण करणे, हे या स्पर्धेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

या सायकलिंग स्पर्धेत बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील विविध भागांतून ३०० हून अधिक स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता आहे. यामध्ये विद्यार्थी, युवक, महिला आणि क्रीडाप्रेमींचा मोठ्या प्रमाणात सहभाग असेल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वांना टी-शर्ट, प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरवण्यात येणार आहे, तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना विशेष बक्षीसे दिली जातील.

सायकलिंग हा केवळ एक खेळ नसून ती उत्तम आरोग्य राखण्याची जीवनशैली आहे, असे अनिल पोतदार यांनी नमूद केले. सध्याच्या काळात तरुण मोबाईल आणि डिजिटल साधनांच्या आहारी जात असताना त्यांना शारीरिक व्यायामाकडे वळवणे गरजेचे आहे आणि ही स्पर्धा त्यासाठी मोलाची ठरेल.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी सर्व तयारी पूर्ण केली असून, जास्तीत जास्त नागरिकांनी व क्रीडाप्रेमींनी यात सहभागी होऊन पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी माजी विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments