बेळगाव तालुक्यातील कडोली गावामध्ये ओटीएस अंतर्गत कर्ज खाती बंद केल्यानंतरही बँकेने बचत खाती ब्लॉक केली आहेत. यामुळे हक्काचे पैसे काढता येत नसल्याने शेतकरी अडचणीत आले असून शेतकरी संघटनांनी याविरोधात आंदोलन पुकारले आहे.

या संदर्भात कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हसिरू सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बँक व्यवस्थापक व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. ओटीएस अंतर्गत कर्ज प्रकरणांची पूर्ण तडजोड झाली असतानाही, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली रोजगार हमी योजना आणि इतर शासकीय अनुदानाची रक्कम काढण्यास बँक प्रशासनाने कायदेशीर अडथळा निर्माण केला आहे. बँकेच्या या निर्णयामुळे शेतीची कामे आणि दैनंदिन खर्चासाठी पैसे उपलब्ध नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

दरम्यान, बँक अधिकारी शेतकऱ्यांना दुसऱ्या बँकेत खाते उघडण्याचा सल्ला देत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. कडोली गावातच बँकेची सुविधा असताना शेतकऱ्यांनी इतरत्र का भटकावे, असा सवाल शेतकरी नेत्यांनी केला आहे. यावर बँक प्रशासनाने लेखी स्पष्टीकरण दिले असून, पॅन इंडिया पातळीवर एनपीए खाती ब्लॉक केल्यामुळे रक्कम काढता येत नसल्याचे म्हटले आहे. ग्राहकांनी आधार कार्ड दुसऱ्या बँकेशी लिंक करून पेन्शन किंवा इतर पैसे तिथे वर्ग करावेत, असे बँकेने स्पष्ट केल्यामुळे शेतकरी आणि बँक प्रशासनातील वाद अधिक चिघळला आहे.


Recent Comments