बेंगळुरू नंतर आता बेळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीवर अंकुश मिळवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. रस्ते अपघात, चोरी आणि दरोड्यांसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिसांनी ही महत्त्वाची मोहीम हाती घेतली आहे.


बेळगाव जिल्ह्याला कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांची सीमा असल्याने येथे गुन्ह्यांचे प्रमाण वाढत होते. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात १.४३ लाखांहून अधिक रस्ते अपघात आणि २०० हून अधिक चोरी व दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. हे आव्हान पेलण्यासाठी जिल्हा पोलिसांनी ५० एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे प्रमुख महामार्ग, जंक्शन आणि सार्वजनिक ठिकाणी बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ७.५० कोटी रुपयांचा निधी दिला असून, २०० हून अधिक ठिकाणी कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वाहतुकीचे नियम पाळले जाण्यासह गुन्ह्यांच्या तपासकामात मोठी मदत होईल आणि ‘सुरक्षित शहर, सुरक्षित गाव’ हे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी व्यक्त केली आहे.


Recent Comments