Belagavi

येळ्ळूरमधील समस्यांबाबत जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

Share

येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील प्रलंबित समस्या त्वरित सोडवाव्यात, या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांना निवेदन देऊन प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

गेल्या वर्षभरापासून ‘इ-स्वत्तू’ (संगणकीकृत मालमत्ता उतारा) मिळत नसल्याने नागरिकांचे कर्ज व्यवहार आणि मालमत्ता हस्तांतरणाची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. याशिवाय गावातील सरकारी स्मशानभूमीत वीज, पाणी आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

जलजीवन मिशन अंतर्गत नळ जोडणी न मिळाल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पावसाळा तोंडावर आला तरी नाल्यांची योग्य स्वच्छता करण्यात आलेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वेळेत कर न भरल्यास दंड आकारणारे प्रशासन सुविधा देण्यात अपयशी ठरल्याची नाराजी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी व्यक्त केली.

‘इ-स्वत्तू’ दाखले देणे, पाणीपुरवठा सुरळीत करणे, स्मशानभूमीच्या रस्त्याची दुरुस्ती आणि नाल्यांची स्वच्छता या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, तसेच घरपट्टी आणि पाणीपट्टीवर बहिष्कार टाकू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नांदूरकर, परशुराम परीट, निखिल पाटील यांच्यासह प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: