State

रामालिंगारेड्डी यांचा मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा

Share

बंगळुरू मधील नगरविकास खाते न मिळाल्याने नाराज झालेले मंत्री रामालिंगारेड्डी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे पाठवला आहे. या अनपेक्षित निर्णयामुळे नवनिर्वाचित काँग्रेस सरकारमध्ये मोठी राजकीय कोंडी निर्माण झाली आहे.

या संदर्भात कोरमंगला मधील आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रामालिंगारेड्डी यांनी पार्श्वभूमी स्पष्ट केली. २०२३ मध्ये सध्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि डी. के. सुरेश माझ्या घरी आले होते, अशी माहिती त्यांनी दिली. पुढे मीच मुख्यमंत्री होणार असून तुम्हाला बंगळुरू नगरविकास खाते देईन, असे आश्वासन त्यांनी दिले होते. शपथविधीपूर्वी झालेल्या भेटीतही याच आश्वासनाचा पुनरुच्चार करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात जलसंपदा खाते देण्यात आले. अशा परिस्थितीत आपल्या विवेकबुद्धीला स्मरून काम करणे शक्य नसल्याने आपण मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचा खुलासा रामालिंगारेड्डी यांनी केला.

गेल्या ५३ वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत असून पक्षाने आपल्याला अनेक संधी दिल्या कृतज्ञतापूर्वक उल्लेख त्यांनी केला. नऊ वेळा आमदार होण्याची संधी मिळाली असून वीरप्पा मोईली यांनी स्वतः बोलावून तिकीट दिले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. वीरप्पा मोईली, एस. एम. कृष्णा, धरमसिंग आणि सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात काम केले असून आपण कधीही कोणाकडे मंत्रिपद मागितले नव्हते, असे रामालिंगारेड्डी यांनी स्पष्ट केले.

मागील घडामोडींचा संदर्भ देत, २०२३ मध्ये सिद्धरामय्या यांनी मंत्रिपद दिले होते, असे रामालिंगारेड्डी यांनी सांगितले. त्यावेळी बैरती सुरेश यांनी आपल्याला बोलावून सिद्धरामय्या यांच्यासोबत बैठक घडवून आणली होती. त्या बैठकीत बंगळुरू नगरविकास खाते देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आपण स्वतःहून या खात्याची मागणी केली नव्हती, मात्र खातेवाटपाच्या वेळी परिवहन खाते देण्यात आले. त्यानंतर बैरती सुरेश यांनी फोन करून नियोजनात बदल झाल्याचे कळवले होते, असे ते म्हणाले. आपण काँग्रेस पक्षामध्येच राहणार असून आमदार म्हणून काम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्यक्ष जाऊन राजीनामा देण्याची इच्छा नसल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री सचिव तुषार गिरीनाथ यांच्याकडे राजीनामा पत्र सुपूर्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. केवळ खात्यासाठी राजीनामा देत नसून, त्यामागील नेमकी कारणे माध्यमांसमोर स्पष्ट करत असल्याचे त्यांनी नमूद केले. एस. एम. कृष्णा यांनी आपल्या मंत्रिमंडळात केवळ एक वर्षासाठी बंगळुरू नगरविकास खाते दिले होते आणि आपण सर्वच विभागांमध्ये उत्तम काम केले आहे, असे रामालिंगारेड्डी यांनी म्हटले.

Tags: