Belagavi

केवळ वृक्षारोपणावर न थांबता झाडे मोठी होईपर्यंत जपा; न्यायाधीशांचे आवाहन

Share

बेळगावमधील नवीन न्यायालय परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वृक्षारोपण करून झाडे जगवण्याचा संदेश देण्यात आला. केवळ झाडे लावण्यापेक्षा त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.


बेळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वकील संघ आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘आईच्या नावाने एक झाड’ या संकल्पनेअंतर्गत न्यायालय परिसरात विविध प्रकारची रोपे लावून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

या प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे आणि पहिले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सुभाष संकदम यांनी वाढत्या निसर्ग संकटांवर चिंता व्यक्त केली. अलिकडच्या काळात उद्भवणाऱ्या अतिवृष्टी आणि दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींना रोखायचे असेल तर वृक्षलागवड हाच एकमेव पर्याय आहे, असे त्यांनी सांगितले. रोपे लावून ती तशीच सोडून न देता, जोपर्यंत त्यांचे मोठ्या झाडात रूपांतर होत नाही, तोपर्यंत त्यांची जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन सुभाष संकदम यांनी केले.

वकील संघाचे उपाध्यक्ष पवन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही मोहीम पार पडली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव आणि न्यायाधीश के. एन. शिवकुमार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला बेळगाव तालुक्यातील सर्व न्यायाधीश, उपवनसंरक्षक क्रांती एन., सहाय्यक वनसंरक्षक नागराज बाळेहोसूर आणि परिक्षेत्र वनअधिकारी प्रशांत एल. गौराणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी मिळून पर्यावरण संरक्षणाचा आणि लावलेली झाडे जगवण्याचा संकल्प केला.

Tags: