Belagavi

शिवानुभवाच्या माध्यमातून सामाजिक समृद्धी शक्य

Share

बेळगावमधील ऐतिहासिक कारंजीमठात ३०० व्या शिवानुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्संगाच्या माध्यमातून मानवी मूल्यांचा विकास आणि सामाजिक समृद्धी शक्य असल्याचे प्रतिपादन निडसोसी मठाचे डॉ. पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी केले.

कारंजीमठात अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात डॉ. पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी आशीर्वादपर मार्गदर्शन केले. मठांनी समाजात वैचारिक प्रगती, संस्कार आणि सेवेची परंपरा जिवंत ठेवली असून कारंजीमठात गेल्या तीन दशकांपासून अविरत सुरू असलेले कार्य प्रशंसनीय असल्याचे त्यांनी म्हटले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवलेले खडकलाट विरक्तमठाचे शिवबसव स्वामीजी यांनी विचार मांडले. १२ व्या शतकातील बसवेश्वरांच्या काळापासून सुरू झालेली शिवानुभव परंपरा आजही समाजाला योग्य दिशा दाखवत असून, आजच्या यांत्रिक युगात मानवी शांततेसाठी या उपक्रमाची अत्यंत गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी ताळीकोटीचे सिद्धलिंग देवू यांनी विशेष व्याख्यान दिले. माणसाने राग, द्वेष आणि अहंकार सोडून सर्वांशी प्रेमाने व सलोख्याने वागणे हीच जीवनाची खरी सार्थकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

याच कार्यक्रमात इंडोनेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय रोबोट तंत्रज्ञान स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विठ्ठल गदग आणि सुशांत बंडीवड्डर या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच त्यांचे मार्गदर्शक शिक्षक दयानंद मगदूम यांचाही गौरव करण्यात आला. कारंजीमठाचे गुरुसिद्ध महास्वामीजी यांनी शाल व श्रीफळ देऊन सर्वांना सन्मानित केले.

प्रारंभी कुमारेश्वर संगीत शाळेच्या विद्यार्थ्यांनी वचन प्रार्थना सादर केली. प्रकाश गिरिमल्लनवर यांनी स्वागत केले, ए. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर व्ही. के. पाटील यांनी आभार मानले. या वेळी डॉ. एफ. व्ही. मानवी, बसवराज हळिंगळी, श्रीकांत शानवाड, मिथुन अंकली यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक उपस्थित होते.

Tags: