Belagavi

नूतन सिद्धरामेश्वर सीबीएसई शाळेचे बेळगावमध्ये थाटात उद्घाटन

Share

आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज संपूर्ण जगाची माहिती मोबाईल आणि टॅबच्या माध्यमातून एका क्लिकवर उपलब्ध होत असून, यामुळे हे विशाल जग अधिक जवळ आले आहे, असे प्रतिपादन गदग येथील तोंटदर्य मठाचे जगद्गुरु डॉ. तोंटद सिद्धराम महास्वामी यांनी केले.

बेळगावमधील शिवबसवेश्वर नगर येथील एस. जी. बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालयाच्या प्रांगणातील एस. जी. संबरगीमठ सभागृहात आयोजित नूतन सिद्धरामेश्वर सीबीएसई शाळेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. तोंटद सिद्धराम महास्वामी बोलत होते.

या कार्यक्रमाचे सान्निध्य लाभलेले नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामी यांनी, प्रत्येक पालकाची आपल्या मुलाला डॉक्टर किंवा इंजिनिअर बनवण्याची इच्छा असते, मात्र शिक्षणाचा पाया भक्कम नसल्यास ध्येय गाठणे कठीण होते, असे म्हटले. उत्तम संस्कारांसह परवडणाऱ्या शुल्कात दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने ही सीबीएसई शाळा सुरू करण्यात आली असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. अल्लमप्रभू महास्वामी यांनी केले.

कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले पोतदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राज हुलमनी यांनी, विद्यार्थ्यांच्या मेंदूचा ९५ टक्के विकास पहिल्या दहा वर्षांतच होतो, त्यामुळे बालपणात योग्य शाळेची निवड करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. २१ व्या शतकातील सर्व आधुनिक सुविधा असलेल्या या शाळेची निवड केल्याबद्दल त्यांनी पालकांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सिद्धरामेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव एस. पी. हिरेमठ यांनी, शिक्षण सर्वच शाळा देतात, मात्र संस्कारयुक्त शिक्षण मिळणे गरजेचे आहे आणि अशा शिक्षणातूनच सक्षम समाज निर्माण होऊ शकतो, असे म्हटले.

प्रारंभी, सीबीएसई शाळेचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शिक्षिका सविता राव आणि शिल्पा आमटे यांनी सूत्रसंचालन केले, तर सविता एच. यांनी आभार मानले.

Tags: