केंद्र सरकारच्या एलपीजी गॅस आणि इंधन दरवाढीच्या विरोधात बेळगाव मधील महिला काँग्रेसच्या वतीने भररस्त्यात चूल मांडून आणि स्वयंपाक करून अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारला दरवाढीबाबत सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.


बेळगाव मधील राणी चन्नम्मा चौकात काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल पेटवून, जेवण आणि चहा बनवून तो नागरिकांना वाटत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला.

आंदोलनात सहभागी झालेल्या आयेशा सनदी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. इंधन आणि गॅसचे दर नियंत्रित ठेवण्यात सरकार अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्या आता कुठे आहेत, असा सवाल करत पुढील सात दिवसांत एलपीजी आणि पेट्रोल-डिझेलचे दर कमी न केल्यास दिल्लीत जाऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आयेशा सनदी यांनी दिला.

महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष लता शिवाजीराव माने यांनी केंद्र सरकारच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य कष्टकरी वर्ग अडचणीत आल्याचे सांगितले. महागाईमुळे महिला वर्गाचे बजेट कोलमडले असून, केंद्र सरकारने तात्काळ ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी लता शिवाजीराव माने यांनी केली.

या आंदोलनात गॅरंटी योजनांचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह काँग्रेसचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments