बेळगाव तालुक्यातील बस्तवाड गावात श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास योजनेच्या निधीतून पुनरुज्जीवित करण्यात आलेल्या ९४५ व्या ‘आमचा गाव, आमचा तलाव’ उपक्रमांतर्गत तलावाचा हस्तांतरण सोहळा संपन्न झाला.


मनोहर मुच्चंडी यांनी नामफलकाचे अनावरण करून या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मकांत पाटील होते, तर बशीर अहमद किल्लेवाले यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.


या वेळी बोलताना जिल्हा संचालक सतीश नाईक यांनी सांगितले की, श्री धर्मस्थळ ग्रामविकास योजनेच्या वतीने अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले जात असून, त्यामध्ये तलाव पुनरुज्जीवनाचा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागात उन्हाची तीव्रता आणि दुष्काळामुळे महिलांना पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच प्राणी-पक्ष्यांसाठी पाण्याची सोय नसल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. ही समस्या लक्षात घेऊन धर्मस्थळचे धर्माधिकारी डॉ. डी. वीरेंद्र हेगडे आणि मातृश्री हेमावती व्ही. हेगडे यांनी संपूर्ण राज्यात सुमारे १००० तलावांचे पुनरुज्जीवन केले आहे. या उपक्रमामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे.
प्राणी-पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाल्याने संपूर्ण समाजाचा फायदा झाला आहे. त्यामुळे हे जीवनदायी पाणी वाचवून पुढील पिढीकडे सोपवावे, असे आवाहन सतीश नाईक यांनी केले. यानंतर कल्मेश्वर तलाव अधिकृतपणे ग्रामपंचायत आणि कल्मेश्वर तलाव समितीकडे हस्तांतरित करण्यात आला.
तलावाच्या पुनरुज्जीवनाबाबत बोलताना ग्रामपंचायत विकास अधिकारी आशा यांनी समाधान व्यक्त केले. हा तलाव संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श ठरेल, अशा पद्धतीने त्याचा पुढील विकास केला जाईल, अशी प्रतिक्रिया आशा यांनी दिली.
या प्रसंगी माजी अध्यक्ष चारू कीर्ती, धारवाड प्रादेशिक विभागाचे तलाव अभियंता निंगराज उपस्थित होते. क्षेत्र योजनाधिकारी पार्वती यांनी स्वागत केले. तसेच राजेंद्र पाटील, राजू पाटील, बशीर अहमद किल्लेवाले, मनोहर मुच्चंडी, चंद्रकांत पाटील, भरमप्पा, गौडा केंनचगोळ, गुंडू बडवण्णावर आदी मान्यवर उपस्थित होते. कृषी पर्यवेक्षक महांतेश यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर पर्यवेक्षिका कमला यांनी आभार मानले.


Recent Comments