Belagavi

तरुणाच्या खूनप्रकरणी २४ तासांत पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या

Share

बेळगाव जवळील हुंच्यानट्टी गावाच्या शिवारात पूर्ववैमनस्यातून आणि सेकंड हँड कार खरेदीच्या पैशांच्या व्यवहारातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत हत्येनंतर अवघ्या २४ तासांत ५ आरोपींना अटक केली आहे.

बेळगाव तालुक्यातील मजगाव येथील राहुल तळवार या २२ वर्षीय तरुणाचा या वादात बळी गेला आहे. सेकंड हँड कार खरेदी करून ती परत केल्यानंतर पैशांच्या देवाणघेवाणीवरून हा वाद झाला होता. हेच पूर्ववैमनस्य मनात ठेवून मंजुनाथ शितीमणी आणि त्याच्यासोबतच्या ७ ते ८ जणांच्या टोळीने पैशांचे कारण काढून राहुलला हुंच्यानट्टी गावाजवळील एका निर्जन ठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर राहुलवर तलवार आणि इतर घातक शस्त्रांनी गंभीर हल्ला करण्यात आला. डोक्यावर आणि हातावर गंभीर जखमा झालेल्या राहुलला तातडीने बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी २४ तासांत ५ आरोपींना गजाआड केले आहे.

राहुल कोणत्याही वादात नव्हता, तरीही केवळ द्वेषातून त्याची हत्या करण्यात आली असून आमच्या भावाच्या मारेकऱ्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मृत राहुलच्या भावाने केली आहे.

मंजुनाथ नावाचा व्यक्ती आपल्या मुलांशी वारंवार वाद घालत होता आणि आरोपींनी राहुलला फोन करून बोलावून घेत फसवणुकीने त्याची हत्या केली आहे. राहुलचा यात काहीही दोष नव्हता, त्यामुळे त्याच्या मारेकऱ्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी आर्त हाक मृत राहुलच्या आईने आणि नातेवाइकांनी दिली आहे.

या हत्येच्या पार्श्वभूमीवर, सेकंड हँड कार खरेदी करून ती परत केल्यानंतर झालेल्या पैशांच्या वादातून ही घटना घडल्याचे बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले. तसेच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनेनंतर २४ तासांच्या आत ५ आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती भूषण बोरसे यांनी दिली आहे.

Tags: