Belagavi

महाजन अहवालाचे तुणतुणे वाजवत वाटाळांकडून मनपा वेठीस

Share

बेळगाव सीमाप्रश्नावरून वाटाळ नागराज यांनी बेळगावात तातडीची परिषद घेऊन मराठी भाषिकांच्या भावना दुखावणारा पवित्रा घेतला आहे. महाजन अहवालाचे तुणतुणे वाजवत २ जूनपर्यंत बेळगाव महानगरपालिकेने ठराव मंजूर करावा, अशी अन्यायकारक मागणी त्यांनी केली आहे. हा ठराव मंजूर न झाल्यास ‘अखंड कर्नाटक बंद’ची वल्गना त्यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना वाटाळ नागराज यांनी लोकप्रतिनिधींवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. २ जूनपर्यंत महानगरपालिकेत हा ठराव मंजूर झालाच पाहिजे, असा हेका त्यांनी धरला आहे. तसे न झाल्यास आंदोलन करण्याचा आणि ४ जून रोजी बैठक बोलावून बंद पाडण्याची वल्गना त्यांनी केली असून, यामुळे सीमाभागातील मराठी जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसवण्यात आलेल्या हलमिडी शिलालेखाच्या प्रतिकृतीचा वापर करून संघटनांकडून शक्तीप्रदर्शन केले जात आहे. बेळगावचे महापौर ठराव मंजूर करण्याबाबत सरकारला पत्र लिहिणार असल्याचे सांगत असले, तरी वाटाळ नागराज यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच टीका केली आहे. पालिकेने तात्काळ ठराव मंजूर करावा, अन्यथा सरकारने लोकशाही मार्गाने निवडून आलेली बेळगाव महानगरपालिकाच बरखास्त करावी, अशी थेट मागणी करून त्यांनी मराठी भाषिकांच्या लोकशाही हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न केला आहे.

या वेळी उपस्थित इतर कार्यकर्त्यांनीही बेळगावमधील मराठी अस्मितेला आव्हान देणारी विधाने केली. महानगरपालिकेत ठराव मंजूर व्हावा यासाठी सुमारे २० संघटना एकत्र आल्या असून वाटाळ नागराज यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन तीव्र केले जाईल, असे सांगत सीमाभागात जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Tags: