बेळगावमध्ये रेशन दुकानांवरील सर्व्हर समस्येने तीव्र रूप धारण केले असून, धान्यासाठी गरिबांना ताटकळत राहावे लागत आहे. या समस्येला कंटाळलेल्या जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांनी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत प्रशासनाचा निषेध केला.

बेळगाव जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सर्व्हर डाऊन असल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी मांडत दुकानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला मागण्यांचे निवेदन सादर केले.

चालू महिन्याच्या सुरुवातीपासूनच रेशन दुकानांवरील सर्व्हरची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. सर्व्हर संथ गतीने चालत असल्याने नागरिकांच्या अंगठ्याचा ठसा (थंब) स्वीकारण्यासाठी खूप वेळ लागत आहे. त्यामुळे गरिबांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत रेशन दुकानांसमोर रांगेत उभे राहावे लागत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४० टक्के तांदळाचे वाटप झाले असून ६० टक्के वाटप अजून बाकी आहे. अशातच अन्न नागरी पुरवठा विभागाने एका व्यक्तीकडून दोनदा अंगठ्याचा ठसा घेण्याचा नियम लागू केल्याने अडचणी आणखी वाढल्या आहेत. एकदाच ठसा उमटणे कठीण झाले असताना दोनदा सक्ती करणे अन्यायकारक असून, पुढील महिन्यापासून केवळ एकदाच ठसा घेण्याची परवानगी द्यावी आणि सर्व्हरची समस्या कायमची सोडवावी, अशी मागणी राजशेखर तळवार यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी रेशन दुकानदारांचे हे निवेदन स्वीकारून या समस्येवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. या आंदोलनप्रसंगी बेळगाव जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी आणि रेशन दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments