Belagavi

एल अँड टी कंपनीकडून कंत्राटी कामगारांना कामावरून हटवण्याची नोटीस

Share

बेळगावमधील कंत्राटी कामगारांना एल अँड टी कंपनीने अचानक कामावरून हटवण्याची नोटीस बजावली आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात कामगारांनी आज महापौरांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली.


जलवाहिनी विभागात सुमारे २८ ते ३० वर्षे अहोरात्र सेवा बजावल्यानंतर या कामगारांना एल अँड टी कंपनीकडे वर्ग करण्यात आले होते. मात्र, आता निधीची कमतरता असल्याचे सांगून कंपनीने या कामगारांना अचानक सेवेतून मुक्त करण्याची तयारी सुरू केली आहे. मूळ अटीनुसार दोन वर्षांच्या सेवेनंतर एल अँड टी कंपनीने या कामगारांना पुन्हा बेळगावमधील संबंधित विभागाकडे सुपूर्द करणे बंधनकारक होते. मात्र, कोणताही पूर्वसंकेत न देता घाईघाईने घेतलेल्या या निर्णयामुळे कामगारांच्या मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

तसेच, अलीकडेच रुजू झालेल्या काही अधिकाऱ्यांना नातेवाईकांना आणि आमदारांच्या शिफारशीवरून आलेल्या कर्मचाऱ्यांना कोणतीही नोटीस न देता सेवेत कायम ठेवण्यात आल्यामुळे कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर दलित नेते मल्लेष चौगुले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौर प्रीती कामकर यांची भेट घेऊन त्यांना ज्ञापन सादर केले.

या कामगारांनी सुमारे ३० वर्षे जलवाहिनी विभागात प्रामाणिकपणे सेवा दिली आहे. एल अँड टी कंपनीकडे वर्ग केल्यानंतरही त्यांना वेळेवर वेतन दिले जात नव्हते. कामगारांना कंपनीकडे सोपवताना दोन वर्षांनंतर त्यांना पुन्हा बेळगावमधील मूळ विभागात सामावून घेण्याची अट घालण्यात आली होती. मात्र, कंपनीने या नियमांचे उल्लंघन करून कामगारांना अडचणीत आणले आहे. या प्रकरणी महापौरांकडे दाद मागितली असून त्यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. तसेच महापालिका आयुक्त आणि एल अँड टी कंपनीची संयुक्त बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे, असे प्रतिपादन दलित नेते मल्लेष चौगुले यांनी केले.

यावेळी महापौरांना निवेदन देताना मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार उपस्थित होते.

Tags: