बेळगावमधील के. आर. ई. ट्रस्टच्या नामांकित राणी चन्नम्मा कॉलेजमध्ये चालू शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. येथे औषधनिर्माण शास्त्राच्या विविध कोर्सेससह या वर्षापासून नवीन ‘बीसीए’ कोर्सही सुरू करण्यात आला आहे.

कर्नाटक रुरल एज्युकेशनल ट्रस्टअंतर्गत २००१ मध्ये स्थापन झालेले हे नामांकित राणी चन्नम्मा कॉलेज आज शिक्षण, संशोधन आणि समाजसेवेत एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास आले आहे. सुरुवातीला डी. फार्मसी कोर्सने सुरू झालेल्या या संस्थेत आता बी. फार्मसी तसेच फार्मास्युटिक्स, फार्माकोलॉजी आणि नव्याने सुरू झालेल्या क्वालिटी अश्युरन्स विषयात एम. फार्मसीचे पदव्युत्तर कोर्सेस यशस्वीपणे चालवले जात आहेत. यालाच जोडून या वर्षापासून आयटी क्षेत्रात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी बीसीए कोर्सचा समावेश करण्यात आला आहे.

या संस्थेला भारतीय फार्मसी कौन्सिलची (PCI) मान्यता असून, ही संस्था कर्नाटक सरकार आणि बेंगळुरूमधील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी (RGUHS) संलग्न आहे. संस्थेत सध्या ६०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, ३८ अनुभवी प्राध्यापक त्यांना मार्गदर्शन करत आहेत. विद्यापीठाचा उत्कृष्ट निकाल, GPAT आणि GATE परीक्षांमधील विद्यार्थ्यांचे यश, संशोधन निबंध, पेटंट्स, अनुदानित प्रकल्प तसेच क्रीडा आणि इतर शैक्षणिक उपक्रमांत हे कॉलेज नेहमीच आघाडीवर राहिले आहे.

दुसरी पीयूसी विज्ञान (१२ वी सायन्स) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी २ वर्षांचा डी. फार्मसी आणि ४ वर्षांचा बी. फार्मसी कोर्ससाठी प्रवेश सुरू झाले आहेत. बी. फार्मसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एम. फार्मसीमध्ये प्रवेश मिळणार असून, डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश दिला जाईल. यासोबतच कोणतीही पीयूसी (विज्ञान, कला किंवा वाणिज्य) उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रात भवितव्य घडवण्यासाठी नवीन बीसीए कोर्स उपलब्ध आहे. कॉलेजमध्ये हिरवेगार कॅम्पस, सुसज्ज कॉम्प्युटर आणि सायन्स लॅब, आधुनिक उपकरणे आणि अनुभवी प्राध्यापक उपलब्ध आहेत, अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. वसंतराजू यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिक ज्ञान देण्यासाठी कार्यशाळा, औद्योगिक दौरे, सेमिनार आणि सामाजिक जबाबदारी म्हणून कम्युनिटी आऊटरीच प्रोग्राम्स आयोजित केले जातात. विशेष म्हणजे २०१५ पासून सुरू असलेल्या “अक्षय पात्र – अर्न व्हाईल यू लर्न” (शिका आणि कमवा) या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक व गुंतवणुकीच्या ज्ञानासोबतच आर्थिक मदतही दिली जाते. वर्ष २०२४-२५ मध्ये पात्र विद्यार्थ्यांना तब्बल १४.३ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले आहे, असे डॉ. एस. व्ही. वसंतराजू यांनी सांगितले.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शिक्षणासाठी पोषक वातावरणामुळे प्रभावी शिक्षण मिळण्यास मदत होते, या महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थिनीने व्यक्त केली. शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू आणि सुसज्ज प्रयोगशाळा येथे उपलब्ध असून, येथील प्राध्यापक विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत प्रशिक्षण देतात, असे दुसऱ्या एका विद्यार्थिनीने म्हटले आहे.


Recent Comments