देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला सुवर्ण व्यवसाय सध्या अडचणीत सापडला आहे. सरकारच्या अयोग्य निर्णयामुळे आणि वाढत्या किमतींमुळे बेळगावमधील व्यापारी आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.


सोने व्यवसायातून देशाला मोठा महसूल मिळतो, मात्र करात वाढ केल्याने लाखो लोकांचे जगणे कठीण झाले आहे. ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत केलेली टॅक्स वाढ आणि चांदीचे दर चार दिवसांत ३ लाखांच्या पुढे गेल्याने ग्राहक बाजारपेठेपासून दूर गेले आहेत. हिंदू धर्मात लग्नासाठी सोने-चांदी आवश्यक आहे, पण वाढत्या किमतींमुळे प्लास्टिक वापरण्याची वेळ येईल का, असा सवाल उपस्थित होत आहे.

भारत हा ७ लाख कोटींचे सोने आयात करतो आणि त्यावर ८० टक्के जनता अवलंबून आहे. नोटाबंदी आणि कोरोनामुळे आधीच व्यवसाय खचला असून आता कराच्या ओझ्यामुळे व्यापारी त्रस्त आहेत. २१ लाख कोटींचा जीएसटी सुवर्णकार देतात, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. “जर हीच परिस्थिती राहिली तर आम्ही बेमुदत संप पुकारू,” असे व्यापारी अनिल पोतदार यांनी सांगितले.
पवार ज्वेलर्सचे संजय पोतदार यांनी सांगितले की, “चांदीचे दर गगनाला भिडल्याने विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. कर कपात केल्यास व्यापाराला उभारी मिळेल.”
बंगाली कारागिरांची अवस्था बिकट झाली असून बेळगावमध्ये असे सुमारे ६-७ हजार कारागीर आहेत. “खरेदी कमी झाल्याने आमच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे,” अशी व्यथा बंगाली कामगारांनी मांडली आहे.
एकीकडे सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले असताना, दुसरीकडे सरकारी करांच्या कात्रीत सुवर्णकार अडकले आहेत. बेळगावमधील व्यापाऱ्यांचा हा संताप आता सरकारपर्यंत पोहोचणार का? आणि सोन्याच्या झळांमधून सामान्यांना आणि कारागिरांना दिलासा मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


Recent Comments