Belagavi

बेळगाव महापालिकेत मराठी नगरसेवकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न; कन्नड संघटनांचा हुल्लडबाज मोर्चा

Share

बेळगावमध्ये पुन्हा एकदा सीमावादाचा मुद्दा जाणीवपूर्वक तापवला जात असून, महानगरपालिकेच्या सभेच्या निमित्ताने मराठी लोकप्रतिनिधींची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न झाला आहे. ‘करवे’ (शिरामगौडा गट) या कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज महानगरपालिकेवर मोर्चा काढत मराठी नगरसेवकांवर दबाव आणण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

बेळगाव महानगरपालिकेची महत्त्वाची सभा आज आयोजित करण्यात आली असताना, त्यापूर्वीच कन्नड संघटनांनी महापालिका परिसरात गोंधळ घातला. वाजीद हिरेकोडी याच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महापालिका आवारात घुसून घोषणाबाजी केली. कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सीमावादावर मराठी माणसाच्या हक्कांवर गदा आणणारा ‘महाजन अहवाल’ सक्तीने स्वीकारण्याचा ठराव करावा, या मागणीसाठी हे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

मराठी भाषिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांवर आणि लोकप्रतिनिधींवर दबाव टाकण्यासाठीच हे आंदोलन घडवून आणल्याचे स्पष्ट दिसत आहे. आंदोलकांनी सभेतील नगरसेवकांना धमकावण्याचाही प्रयत्न केला, ज्यामुळे लोकशाही प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. “महाजन अहवालाचा ठराव मंजूर न झाल्यास एकाही नगरसेवकाला बाहेर पडू देणार नाही,” असा धमकीवजा इशारा देऊन या संघटनांनी आपल्या माकडउड्या सुरूच ठेवल्या आहेत.

कन्नड संघटनांच्या या हुल्लडबाजीमुळे महापालिका परिसरात अत्यंत तणावाचे वातावरण असून, सीमाभागातील मराठी माणसांमध्ये संतापाची लाट आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या नगरसेवकांना अशा प्रकारे धमकावणे हे अत्यंत निषेधार्ह आहे. प्रशासनाने या हुल्लडबाजांना वेळीच लगाम घालावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

या आंदोलनादरम्यान एक मोठे नाट्य पाहायला मिळाले. यापूर्वी महापालिका आवारात विनापरवाना ध्वजस्तंभ उभारणारे कार्यकर्ते श्रीनिवास ताळूकर यांनी थेट सभेच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न केला. लोकशाही प्रक्रियेत अशा प्रकारे अडथळा निर्माण करणाऱ्या ताळूकर यांना पोलिसांनी तातडीने रोखले आणि बळाचा वापर करून ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा आंदोलकांनी निषेध केला, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना तेथून हटवले.

या गोंधळामुळे सकाळी ११ वाजता सुरू होणारी महापालिकेची सभा तब्बल दोन तास लांबणीवर पडली. अखेर महापौर प्रीती कामकर आणि उपमहापौर हनुमंत कोंगली यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले आणि या विषयावर सभेत चर्चा करण्याचे आश्वासन दिले, त्यानंतर परिसरातील तणाव काहीसा निवळला.

Tags: