“उद्या माझ्या पत्नीचे दुसरे लग्न लावले जात आहे, कृपया ते थांबवा,” अशी आर्त साद घालत एका व्यक्तीने बेळगावमध्ये माध्यमांसमोर आपली व्यथा मांडली. प्रेमविवाह केलेल्या पत्नीला घरच्यांनी डांबून ठेवले असून, आता तिचे दुसऱ्या व्यक्तीशी लग्न लावून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

प्रेमविवाह केलेल्या पत्नीचे तिच्या घरच्यांनीच अपहरण केले असून, आता ते तिचे दुसरे लग्न लावून देत असल्याचा गंभीर आरोप व्यंकटेश्वर राठोड यांनी केला आहे. मंगळवारी बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली व्यथा मांडली. व्यंकटेश्वर यांनी सांगितले की, २०१६ पासून परिचय असलेल्या मंजुळा हंचिनमणी यांच्याशी २०२२ मध्ये त्यांनी कायदेशीर विवाह केला होता. मात्र, आता मंजुळाचे वडील रुद्रप्पा आणि भाऊ प्रदीप यांनी तिला घरात कोंडून ठेवले असून तिचा छळ केला जात आहे. इतकेच नाही तर उद्याच तिचे दुसऱ्या एका व्यक्तीशी लग्न लावून देण्याची तयारी सासरच्या मंडळींनी केली आहे, अशी भीती व्यंकटेश्वर राठोड यांनी व्यक्त केली आहे.

केवळ लग्नच नाही, तर आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करून आपल्याला तुरुंगात पाठवण्यात आले होते, असे व्यंकटेश्वर राठोड यांनी म्हटले. सासरच्यांना घर बांधण्यासाठी लाखो रुपये दिले असतानाही, त्यांनी आपल्यावर हल्ला करून दागिने आणि पैसे लुटल्याचा आरोप व्यंकटेश्वर राठोड यांनी केला आहे. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, आपला संसार वाचवावा आणि बेकायदेशीरपणे लावले जाणारे दुसरे लग्न तातडीने थांबवावे, अशी विनंती व्यंकटेश्वर राठोड यांनी पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे.


Recent Comments