Belagavi

धार्मिक संस्कार शिबिरांच्या माध्यमातून धर्मरक्षण शक्य

Share

आपली संस्कृती आणि धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी मुलांवर चांगले संस्कार करणे काळाची गरज आहे. संस्कार शिबिरांच्या माध्यमातूनच आपण धर्माचे रक्षण करू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ रविराज पाटील यांनी केले.

बेळगावमधील अनगोळ येथील श्री आदिनाथ सांस्कृतिक भवनमध्ये जैन आगम मिशनतर्फे आयोजित १० व्या जैन धार्मिक शिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मुलांमध्ये धार्मिक संस्कार रुजवणे हे पालकांचे आद्य कर्तव्य असल्याचे पाटील यांनी यावेळी नमूद केले. अनगोळमधील जैन समाज गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने अशा शिबिरांचे आयोजन करत असल्याबद्दल त्यांनी समाजाचे कौतुक केले.

या सोहळ्याला उपस्थित आचार्य श्री धर्मसेन मुनींनी आपले आशीर्वाद दिले. आजच्या काळात मुलांमध्ये मोबाईलचे वेड वाढत असून, त्यांना यापासून दूर ठेवण्याची जबाबदारी पालकांची आहे. मुले कोणत्याही वाईट व्यसनांना बळी पडू नयेत, यासाठी पालकांनी विशेष काळजी घ्यावी, असा संदेश मुनींनी दिला.

सुधाताई बाळासाहेब पाटील आणि पल्लवी सचिन पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बी. टी. पाटील सन्स यांच्या वतीने शिबिरार्थींना धार्मिक पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला व्यासपीठावर राजू हनमण्णवर, राजू बेंडीगेरी, धनपाल पाटील उपस्थित होते. शिबिरात अनेकांत शास्त्री आणि मिथुन शास्त्री यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी अनगोळमधील जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: