देशाचे भवितव्य घडवण्यात सिव्हिल इंजिनिअर्सची भूमिका महत्त्वाची असून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणपूरक बांधकामे करावीत, असे आवाहन बेळगावमधील कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात करण्यात आले.


बेळगावमधील काकती येथील खाजगी हॉटेलमध्ये बुधवारी संध्याकाळी कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. २०२६-२८ या कालावधीसाठी अजय पाटील यांनी अध्यक्ष म्हणून, आदर्श मुचंडी यांनी सचिव म्हणून तर जगदीश पावटे यांनी खजिनदार म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला.


या कार्यक्रमाचे उद्घाटन कऱ्हाडकर स्टील्सचे संचालक अमोघ कऱ्हाडकर, सर्वोकंट्रोल्स एरोस्पेसचे व्यवस्थापकीय संचालक दीपक धडोती आदींसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. .यावेळी दीपक धडोती यांनी बोलताना इंजिनिअर्सनी आपल्या तांत्रिक कौशल्याचा वापर समाजाच्या हितासाठी करावा, असे आवाहन केले.

या सोहळ्यात नूतन कार्यकारिणीमधील सी.आर. पाटील (नियुक्त अध्यक्ष), वीरणा शेटेण्णावार (उपाध्यक्ष), भीमसेन जिरळी (सहसचिव) आणि संचालक म्हणून विनय बेहरे, महेश हेब्बाळे, चंद्रकांत मनगुत्ती, संतोष जवळकर, सादिक इनामदार, किरण शिरळकर, बसवराज हम्मणावार आणि वैजनाथ चौगुले यांनी शपथ घेतली.

यावेळी बोलताना अजय पाटील म्हणाले, देशाच्या जडणघडणीत सिव्हिल इंजिनिअर्सचा वाटा मोठा आहे. भावी पिढीसाठी दर्जेदार आणि ऐतिहासिक वास्तूंची निर्मिती करणे हे आपले कर्तव्य असून इंजिनिअर्स हे विकसनशील समाजाचा कणा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
मावळते अध्यक्ष रमेश जी.टी. आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष जवळकर यांनी आपल्या कार्यकाळातील यशाचा आढावा घेतला. ज्येष्ठ सल्लागार उमेश सरनोबत, आनंद कुलकर्णी, पी.एस. हिरेमठ आणि मल्लिकार्जुन मुदनूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला.


Recent Comments