शासकीय आदेशानुसार सुरू असलेले जनगणनेचे अत्यंत महत्त्वाचे काम विहित मुदतीत पूर्ण करावे, असे सक्त निर्देश बेळगाव महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

महानगरपालिकेत पार पडलेल्या जनगणनेच्या कामाच्या आढावा बैठकीत आयुक्त कार्तिक एम. बोलत होते. जनगणनेचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी विविध स्तरावरील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय राखून देखरेख करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. ज्या भागातील जनगणनेचे काम संथ गतीने सुरू आहे, तिथल्या समस्या तातडीने सोडवून कामाला गती द्यावी, असे त्यांनी नमूद केले.

प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि वेग राखण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने दररोज सायंकाळी आपल्या कामाचा प्रगती अहवाल सादर करणे अनिवार्य आहे. कामात निष्काळजीपणा करणाऱ्या किंवा विनाकारण विलंब लावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्त कार्तिक एम. यांनी दिला.
ज्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत जनगणनेचे काम यशस्वीपणे पूर्ण केले आहे, त्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना लवकरच प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल, असेही आयुक्तांनी जाहीर केले. या बैठकीला उपायुक्त (महसूल) डॉ. सिद्धू हुल्लोळी, उपायुक्त उदयकुमार बी.टी. यांच्यासह जनगणनेशी संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments