बेळगाव शहरात जाणवणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणि प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी महानगरपालिकेत महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी पाणीपुरवठा विस्कळीत करणाऱ्या संबंधित कंपन्या आणि अधिकाऱ्यांना महापौरांनी कडक सूचना दिल्या.


महानगरपालिकेच्या परिषद सभागृहात महापौर प्रीती कामकर यांच्या अध्यक्षतेखाली जलमंडळ आणि एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांची विशेष सभा झाली. शहरात पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे नगरसेवकांनी लक्ष वेधले. पाईपलाईनची अर्धवट राहिलेली कामे त्वरित पूर्ण करावीत आणि ज्या भागात टंचाई आहे तिथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करून लोकांची सोय करावी, असे महापौरांनी बजावले. विविध कामांसाठी खोदलेले खड्डे बुजवण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर मे महिन्यापर्यंत सर्व खड्डे बुजवले जातील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
मनोनीत नगरसेवक दिनेश नाशिपुडी यांनी एल अँड टी कंपनीवर गंभीर आरोप केले. कंपनीने अटी व शर्तींचे उल्लंघन करून निकृष्ट दर्जाचे पाईप वापरले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर दंड आकारावा अशी मागणी त्यांनी केली. तर नगरसेविका सारिका पाटील आणि इतर सदस्यांनी नळांच्या तक्रारी आणि बोअरवेल अद्याप महानगरपालिकेकडे हस्तांतरित न झाल्याबद्दल संताप व्यक्त केला.
महापौर प्रीती कामकर यांनी सर्व कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून लोकांचा पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, असे आदेश दिले. या बैठकीला उपमहापौर हनुमंत कोंगाळी, सत्ताधारी गट नेते संतोष पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्ष सदस्य, मनपा आयुक्त कार्तिक एम. आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments