Belagavi

बेळगावच्या जैन इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये ‘अध्याय-२०२६’ महोत्सवाचा उत्साह

Share

बेळगावमधील जैन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या एमबीए विभागाच्या वतीने दोन दिवसीय ‘अध्याय-२०२६’ या मॅनेजमेंट फेस्टला उत्साहात सुरुवात झाली आहे.

मच्छे येथील जैन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या एमबीए विभागातर्फे आज सर एम. व्ही. सभागृहात ‘अध्याय-२०२६’ या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. नेतृत्व आणि उत्कृष्टतेचे व्यासपीठ असलेल्या या सोहळ्यासाठी मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात एमबीएच्या विद्यार्थिनी आत्तिका आणि साक्षी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी “एकत्र येणे ही सुरुवात, एकत्र राहणे ही प्रगती आणि एकत्र काम करणे हे यश आहे,” अशा शब्दांत उपस्थितांना प्रेरित केले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. एस. रोहित राज यांनी मुख्य पाहुणे बसवराज मडिवाळर (उपआयुक्त, वाणिज्य कर विभाग, बेळगाव) यांची ओळख करून दिली.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बसवराज मडिवाळर यांनी सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत सावध केले. “सोशल मीडियापासून दूर राहा आणि ग्रंथालयात अधिक वेळ घालवा,” असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्नांशिवाय स्वप्ने साकार होत नाहीत. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो, त्यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पणाची गरज असते, असेही त्यांनी नमूद केले. सोशल मीडियामुळे तात्पुरती प्रसिद्धी मिळते, मात्र ग्रंथालयातील वाचनामुळे व्यक्तिमत्व घडते आणि विचार करण्याची क्षमता विकसित होते, असे त्यांनी सांगितले.

प्राचार्य आणि संचालक डॉ. जे. शिवकुमार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आयोजक टीमच्या कामाचे कौतुक केले. या दोन दिवसीय महोत्सवात ह्युमन रिसोर्स (HR), मार्केटिंग, फायनान्स, बेस्ट मॅनेजर आणि सांस्कृतिक उपक्रमांसह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनाबद्दल कॉलेज प्रशासनाने एमबीए विभागाचे अभिनंदन केले. पौर्णिमा यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राची सांगता केली. हा महोत्सव उद्याही सुरू राहणार आहे.

Tags: